
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा निरबाडे नं १ येथे कार्यरत असलेल्या उपशिक्षिका सौ अश्विनी माळेकर-पिलके यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. चिपळूण तालुक्यातून एकूण 30 शिक्षकांची निवड झाली आहे.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि अध्यापनातील योगदानाची दखल घेत सौ अश्विनी माळेकर -पिलके यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे निरबाडे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि शिक्षण अधिक प्रभावी व आनंददायी व्हावे, यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. या पार्श्वभूमीवर सौ अश्विनी माळेकर – पिलके यांची झालेली निवड ही चिपळूण तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल आमदार शेखर निकम तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.