लांजा : अनियमित मीटर रीडिंग, अवाजवी सरासरी वीजबिले आणि स्मार्ट मीटर बसविण्याच्या कथित सक्तीमुळे लांजा तालुक्यातील वीज ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महावितरण प्रशासनाला जाब विचारला आहे. या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी तालुकाप्रमुख युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली.

लांजा तालुक्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नियमित मीटर रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा अधिक रकमेची सरासरी बिले पाठवली जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. काही ठिकाणी मीटर रीडिंग घेऊनही त्याची नोंद महावितरणच्या प्रणालीमध्ये अद्ययावत केली जात नसल्याने ग्राहकांना अवाजवी बिलांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे शिवसेनेने निदर्शनास आणून दिले आहे.

याशिवाय लांजा तालुक्यातील सुमारे २२०० वीज मीटर फॉल्टी असल्याचा महावितरण अधिकाऱ्यांकडून केला जाणारा दावा कोणत्या तांत्रिक निकषांवर आधारित आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित मीटरची तपासणी कोणी केली, त्यासाठी कोणती तांत्रिक प्रक्रिया अवलंबली आणि त्याचा अधिकृत अहवाल काय आहे, याची माहिती ग्राहकांना देण्यात यावी. मीटर खरोखरच नादुरुस्त असल्यास त्याची अधिकृत तांत्रिक तपासणी करून संबंधित ग्राहकाला लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्मार्ट मीटरच्या सक्तीचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वी महावितरण कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान शासनाकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याचे सांगण्यात आले होते, असे निवेदनात नमूद आहे. असे असताना जुने मीटर नादुरुस्त असल्याचे कारण देऊन ग्राहकांच्या पूर्वसंमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, लांजा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये स्मार्ट मीटर सक्तीने बसवू नयेत, असे ठराव संमत केले असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. लोकशाही मार्गाने व्यक्त झालेल्या ग्रामसभांच्या भूमिकेचा आणि स्थानिक नागरिकांच्या मतांचा प्रशासनाने आदर करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

गेल्या सहा महिन्यांतील मीटर रीडिंग आणि वाढीव बिलांची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले दुरुस्त करावीत, मीटरच्या तांत्रिक तपासणीचा लेखी अहवाल ग्राहकांना द्यावा आणि स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

वीज ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर आर्थिक भार टाकला जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका घेत महावितरणने या प्रश्नांवर पारदर्शक आणि ठोस कार्यवाही न केल्यास शिवसेनेच्या वतीने कायदेशीर व घटनात्मक मार्गाने दाद मागण्यात येईल, असा इशाराही युवराज हांडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी शहरप्रमुख मोहन तोडकरी, उपशहरप्रमुख प्रकाश गुरव, तालुका युवा अधिकारी अभी राजेशिर्के, विभागप्रमुख लक्ष्मण मोरये, विश्वास मांडवकर, उपविभागप्रमुख शांताराम गुरव, राजेंद्र सुर्वे, अल्लाउद्दीन नेवरेकर, गणेश खामकर, विभाग संघटक पंढरी गुरव, युवा अधिकारी अक्षय कुरूप, शाखाप्रमुख जयराम साईल, यशवंत पड्ये, अनिल सोलकर, माजी सरपंच तानाजी जाधव, शिवसैनिक प्रभाकर यादव, सीताराम मांडवकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.