श्रीवर्धन : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीवर्धन तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्रीवर्धन येथील श्री. भाऊ जोशी यांच्या कार्यालयात सदर दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे तालुकाध्यक्ष नरेश पुलेकर होते.

प्रथम सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ज्ञात-अज्ञात सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचे जगातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, जगभरात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे ८५४.६ दशलक्ष, तर भारतात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे १५७ दशलक्ष इतकी आहे. ही संख्या नगण्य नाही, असे आनंद जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमात वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रत्येकी चार्जिंगची बॅटरी भेटवस्तू म्हणून देण्यात आली.

या कार्यक्रमात बोर्ली पंचतन येथील ९१ वर्षांचे ज्येष्ठ सदस्य तसेच आजही विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले रविदादा कुळकर्णी, सुभाष गंद्रे, डॉ. शुभांगी जोशी, माजी तहसीलदार रोहिणी क्षीरसागर, सौ. प्रविता माने, कार्यवाह चंद्रकांत केळस्कर आणि उपाध्यक्ष नारायण पांढरकामे यांनी आपले विचार व सूचना मांडल्या.