मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांच्या निकालांचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांचा समावेश आहे.

ही समिती संबंधित मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया, पक्षाची प्रचार रणनीती, निवडणुकीतील विजय अथवा पराभवाची कारणे आणि पक्षांतर्गत समन्वयाचा सविस्तर आढावा घेणार आहे. निवडणुकीदरम्यान पक्षाच्या पातळीवर काही त्रुटी राहिल्या होत्या का, याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच मागील काळातील निवडणुकांचा अभ्यास करून त्यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकांवर काही प्रतिकूल परिणाम झाला होता का, याचाही शोध घेतला जाणार आहे. तसेच भविष्यातील निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने समिती आवश्यक शिफारसी करणार आहे.

समितीने आपला सविस्तर अहवाल तीन आठवड्यांच्या आत महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्याकडे सादर करणार असून त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही देणार आहे.