चिपळूण : दि चिपळूण अर्बन को-ऑप बँकेला दिनांक ३१ मार्च २०२६ अखेरच्या संपलेल्या आर्थिक वर्षात ढोबळ नफा रु. ४ कोटी ७९ लाख झाला असून रिझर्व्ह बँकेच्या लेखापरीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या तरतुदी करण्यात आल्या आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्री मोहनशेठ मिरगल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून २१ शाखा तसेच ११ एटीएमद्वारे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांमध्ये बँक कामकाज करत आहे. कोकणातील अग्रगण्य व विश्वासासा पात्र उत्तरणारी बँक असा नावलौकिक बँकेने प्राप्त केला आहे. ‘धनेन जनहिते कार्यम्’ या बँकेच्या ब्रिद वाक्यानुसार बँक सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत विश्वासाची व आपुलकीची सेवा देत आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण ठेवी रक्कम रुपये ४०७.१५ कोटी, तर कर्जपुरवठा रक्कम रुपये ३०१.६५ कोटी मात्रा झाला आहे. बँकेच्या एकूण व्यवसायात रक्कम रु. १५९.६४ कोटींची लक्षणीय वाढ केलेली असून एकत्रित व्यवसाय रक्कम रु. ७०८.८० कोटी इतका झाला आहे.
बँकेचा ढोबळ एन. पी. ए केवळ ०.७४% इतका असून नक्त एन.पी.ए. नेहमीप्रमाणे शून्य टक्के राखण्यात बँकेने यश मिळविले आहे. बँकेच्या गुहागर व डिबीजे कॅम्पस शाखेनंतर थकबाकी शून्य टक्के राखली आहे. तसेच एकूण २१ शाखांपैकी निरंक एनपीए असणाऱ्या १० शाखांचा समावेश आहे. भागभांडवलात यशस्वी रक्कम रु. २.५५ कोटीने वाढ होऊन बँकेचे भागभांडवल मार्च २०२६ अखेर रक्कम रु. १८.५२ कोटी इतके झाले आहे तर सभासद संख्या ४७९६१ इतकी झाली आहे.
थकबाकी नियंत्रणात ठेवण्यात यश प्राप्त झालेले आहे. बँकेचे कर्जदार ग्राहकांनी सुद्धा थकीत रक्कम वसूल करणेस सहकार्य केले आहे तसेच रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार लागू होणाऱ्या सर्व निकषांची बँकेने पूर्तता केली असून यापुढेही ग्राहकांनी बँकेस असेच सहकार्य करावे अशी भावना बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी व्यक्त केली.
मोबाईल बँकिंग, आयएमपीएस, यूपीआय, कोड स्कॅनिंगच्या माध्यमातून ग्राहकांकरिता सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आर्थिक वर्षात ग्राहकांकारिता आकर्षक ठेव योजनांबरोबर व्यापारी व ग्राहकांकारिता नवनवीन कर्ज योजनासुद्धा सुरू केलेल्या असून, सदर योजनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शाखा परिसरातील स्थानिक नागरिकांना व्यवसायाकरिता अर्थसहाय्य करून त्यांच्या व्यवसायाकरिता बँकेने हातभार लावला आहे. बँक पात्र पर्यटनाच्या दृष्टीने टुरिस्ट बसेस, चारचाकी वाहने त्याचबरोबर शासनाच्या आर्थिक लाभांमधून देणाऱ्या आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना बँकेमार्फत राबविण्यात आल्या आहेत. या योजनांचा ग्राहक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत.
बँकेने द.सा.द.शे. ८.१०% व्याजदराने नव्यानेच सुरू केलेल्या ‘धनसंपदा ठेव’ या ठेव योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नागरिकांकरिता हा दर ८.३५% इतका भरघोस ठेवणेत आला आहे. ‘गृहलक्ष्मी ठेव योजना’, ‘संकल्प अल्पमुदत ठेव योजना’ बँकेकडील अशा वेगवेगळ्या ठेव व कर्ज योजनांचा लाभ बँकेच्या सभासद, खातेदार, ग्राहक यांनी घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष धनंजय खातू यांनी केले आहे.
बँकेच्या या यशस्वी वाटचालीमुळे बँकेच्या सभासद व ग्राहकांनी अध्यक्ष मिरगल, उपाध्यक्ष खातू, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सुर्यवंशी यांचे व कर्मचारीवर्गाचे अभिनंदन केले आहे. बँकेचे आजी, माजी संचालक व कर्मचारी यांच्या सहकार्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सुर्यवंशी, बँकेचा अधिकारीवर्ग, शाखाधिकारी व कर्मचारी वर्गाने या वर्षी लक्षणीय कामगिरी केल्याने बँकेच्या ठेवी व कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणेस तसेच निव्वळ एन.पी.ए प्रमाण शून्य टक्के राखणेत बँकेला यश मिळाले आहे. बँकेचे संचालक मंडळ सदस्य व कर्मचारी वर्गाने संयुक्तपणे बँकेच्या प्रगतीसाठी घेतलेली मेहनत ही विशेष उल्लेखनीय आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष मिरगल, उपाध्यक्ष खातू यांनी व्यक्त केली.
या आर्थिक वर्षात बँकेचे माजी उपाध्यक्ष रहीमानशेठ दलवाई यांचा सुद्धा मोलाचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे कोअर कमिटीचे सदस्य सुचयशेठ रेडीज, उमेशशेठ काटकर तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सतिश अप्पा खेडेकर तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे व संचालक मंडळातील सहकारी सदस्य यांचे मार्गदर्शनाने बँकेची वाटचाल चालू आहे. या आर्थिक वर्षात बँकेचे स्वमालकीची सुसज्ज प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ‘गुढी पाडव्याच्या’ शुभमुहूर्तावर दिमाखात पार पडले आहे. ग्राहकांना या माध्यमातून जलद गतीने सोई सुविधा देता येणार आहेत. भविष्यात ही बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक यांचे असेच सहकार्य राहील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी बँकेचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सुर्यवंशी, मुख्य अधिकारी नितीन चिंगळे व अरविंद भागडे हे उपस्थित होते.