चिपळूण : उमरोली येथील भडवळकरवाडी परिसरात ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या पिल्लाची वनविभागाच्या बचाव पथकाने यशस्वी सुटका केली. या धाडसी मोहिमेची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी बचाव मोहिमेत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपविभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनाधिकारी प्रियांका लगड यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ वन्यप्राणी असून त्याचे अस्तित्व फार कमी ठिकाणी आढळते. विशेष म्हणजे, गेल्या तीन ते चार महिन्यांत जिल्ह्यात ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्याची सुखरूप सुटका करण्याची ही दुसरी घटना आहे. वनविभागाच्या बचाव पथकाने दाखवलेले धाडस, कौशल्य आणि तत्परता कौतुकास्पद असून या कामगिरीवरून वनविभागाची रेस्क्यू टीम संपूर्ण महाराष्ट्रात ‘नंबर वन’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचेही पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, जिल्ह्यातील प्रमुख वनाधिकाऱ्यांची जबाबदारी महिला अधिकारी सक्षमपणे सांभाळत आहेत. वन्यप्राण्यांच्या बचाव मोहिमांसारख्या आव्हानात्मक कामांमध्ये त्या धाडसाने आणि कुशलतेने नेतृत्व करीत आहेत. ही अभिमानाची बाब असून त्यांच्या कार्याचे शंभर टक्के कौतुक केले पाहिजे.
विहिरीत पडलेला बिबट्या स्वभावतः आक्रमक असतानाही संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान कोणत्याही नागरिकाला अथवा वनकर्मचाऱ्याला इजा झाली नाही. तसेच बिबट्यालाही कोणतीही इजा न पोहोचवता त्याची सुरक्षित सुटका करण्यात वनविभागाला यश आले. या कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी संपूर्ण बचाव पथकाचे आभार मानले.
या यशस्वी रेस्क्यू मोहिमेमुळे वनविभागाच्या तत्परतेचे आणि वन्यजीव संरक्षणासाठीच्या प्रयत्नांचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्येही मोठे कुतूहल निर्माण झाले होते.
