खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील किंजळे तर्फे नातू येथील कळकरायवाडीमध्ये पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून कोरडे पडलेले पाणवठे आणि विहीर स्वच्छ करण्याची प्रेरणादायी मोहीम यशस्वीपणे राबवली. ” एक दिवस, मातृभूमीसाठी ” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वाडीतील पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेली ३६ फूट खोल विहीर गाळाने भरल्याने तिची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. रविवारी मुंबई आणि पुणे येथून आलेल्या चाकरमान्यांसह ग्रामस्थ सकाळी गावात दाखल झाले आणि स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. विहिरीतील सफाईचे काम अत्यंत धोकादायक असल्याने आवश्यक सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली. मुंबईतील सह्याद्री ट्रेकर्सच्या दोन सदस्यांनी रोपच्या साहाय्याने गावातील पाच तरुणांना विहिरीत उतरवले. विहिरीत सुमारे तीन फूट गाळ साचला होता. खालून भरलेला गाळ बादल्यांमधून वर खेचून काढण्यात आला. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विहीर पूर्णपणे स्वच्छ करण्यात यश आले.