खेड (प्रतिनिधी) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेत खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील १६ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे देशातील नामांकित आयआयटी (IIT) आणि एनआयटी (NIT) अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रेहान मुल्ला, करण कांबळे, सोहम खोपटकर, पार्थ चव्हाण, पवन देवकाते, मानस पालकर, सम्यक शिर्के, आयुषी सावंत, श्रेणी गायकवाड, निलय फुलझेले, स्पंदन मोरे, स्मृती साळवी, संदेश गोखले, आशिष मोहिते, अथर्व बोंडले आणि रुद्राक्ष मोरे यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गशिक्षकांचे सहकार्य तसेच परीक्षा विभागातील शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य नियोजनाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला असून, खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
