चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईत सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बंदुका व जिवंत काडतुसे असा सुमारे रूपये 70,900 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक 18 मार्च 2026 रोजी सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना आगवे येथे महेश जाधव हा इसम अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून पाहणी केली असता घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्याजवळील लाकडी खोपटीत एक इसम बंदुकीची साफसफाई करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव वय 35, रा. आगवे बौद्धवाडी असे सांगितले.
पाहणीदरम्यान त्याच्याकडे एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक आणि 9 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल आढळून आला. शस्त्र बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पंचासमक्ष सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी महेश महेंद्र जाधव याच्याविरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच पोलीस कर्मचारी विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ आणि अतुल कांबळे यांनी केली.