खेड : खेड तालुक्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या एम इ एस नर्सिंग कॉलेज घाणेखुंट लोटे मध्ये “मीरा देशपांडे स्कॉलरशिप” वितरण सोहळा नुकताच पार पडला. पुणे येथील अमनोरा एस फाउंडेशन चे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांनी त्यांच्या मातोश्री कै. मीरा देशपांडे यांच्या स्मरणार्थ ही स्कॉलरशिप अवघ्या दोन महिन्यापूर्वी जाहीर केली आणि काल ती प्रत्यक्षात एम ई एस कॉलेज ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थिनींना वितरित सुद्धा केली. ही स्कॉलरशिप चार श्रेणीमध्ये देण्यात आली होती. यामध्ये गुणवत्ता आणि साधन शिष्यवृत्ती, होस्टेल व स्टडी मटेरियल, सर्व शिक्षण शुल्क आणि आपत्कालीन सहाय्य अशा निकषांमध्ये एकूण ३२ विद्यार्थी विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात विविध स्तरावर काम करणाऱ्या वैद्यकीय सेवकांना आणि अधिकाऱ्यांना “परशुराम पुरस्काराने” ही गौरवण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स, स्टाफ नर्स, अंगणवाडी सेविका,ANM नर्स, हेल्थ विजिटर इत्यादी क्षेत्रात समर्पणाच्या भावनेतून उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा परशुराम पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे चे सचिव डॉक्टर अतुल कुलकर्णी, अमनोरा एस फाउंडेशन पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक कुलकर्णी, रत्नागिरीचे सिविल सर्जन डॉक्टर भास्कर जगताप, म. ए. सो. पुण्याचे अजीम सभासद डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन उत्पात, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य मिलिंद काळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.