चिपळूण : मुंबईतील मुलुंड येथे वास्तव्यास असलेली आणि कोकणातील चिपळूण तालुक्यातील दसपटी भागातील कोळकेवाडी (तांबडवाडी) येथील सुकन्या कु. प्राची वैभवी विजय शिंदे हिने आजोबांचे स्वप्न सत्यात उतरवत कायद्याच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. बी.ए. एलएल.बी. (B.A. LL.B.) पदवीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत ती सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिसिंग अॅडव्होकेट म्हणून कार्यरत आहे.
प्राचीचे वडील विजय रामचंद्रराव शिंदे हे सहाय्यक कक्षाधिकारी आहेत. तिचे आजोबा कै. रामचंद्र गोविंदराव शिंदे यांचे स्वप्न होते की, त्यांच्या नातीने कायद्याचे शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि समाजाची सेवा करावी. आजोबांच्या याच स्वप्नाला प्राचीने आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मूर्त रूप दिले आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या प्राचीने बी.ए. एलएल.बी. पदवीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज ती मुंबई उच्च न्यायालयात वकिली करताना कोकणच्या लेकीचा मान अभिमानाने उंचावत आहे.
कोळकेवाडी गावची कुलस्वामिनी आई रामवरदायिनी आणि ग्रामदेवी आई वाघजाई यांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम राहिला आहे. प्राचीच्या या यशामुळे संपूर्ण कोळकेवाडी गावात तसेच दसपटी विभागात आनंदाचे वातावरण आहे. “मुलगी शिकली, प्रगती झाली.” या उक्तीचे ती मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे.
प्राचीचे वडील विजय शिंदे म्हणाले, “वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केल्याचा आम्हा सर्व कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. प्राचीने केवळ शिंदे कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.”
ग्रामीण भागातील मुलींनी प्राचीचा आदर्श घेऊन शिक्षणाच्या बळावर आपले भविष्य घडवावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्राचीच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
