मुंबई : गुन्हेगारांनो भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे’, ही टॅगलाईन उद्धव ठाकरे यांची होती हे जनाब संजय राऊत विसरले असतील. पुण्यातील विषारी दारूप्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपींवर कारवाई केली आणि दोषी पोलिसांनाही निलंबित करण्याची हिंमत देवाभाऊंनी दाखवली. मुख्यमंत्री असताना वाझे काय लादेन आहे का, म्हणत बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्याचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना एका वाक्याने प्रश्न विचारण्याची हिंमत तुम्ही केली का? असा खडा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.

मराठा समाजासाठी लढा देणे महत्त्वाचे आहे. सरकारनेही मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने केले. या आधीच्या एकाही सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल आदर नव्हता. एकही मागणी मान्य करण्याची हिंमत आधीच्या सरकारने दाखवली नाही, ती देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात 10 टक्के आरक्षण मिळत आहे. मराठवाड्यात 40 डिग्रीच्यावर तापमान असताना मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये. त्यामुळे आपल्याला आणि समाजबांधवांनाही त्रास होणार आहे. कृपया सरकारला सहकार्य करा. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अजूनही तुमच्या काही मागण्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी सरकार चर्चेला तयार आहे. चर्चेतून तोडगा निघतो. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी विनंतीही श्री. बन यांनी केली.