मुंबई : ‘मोदी है तो मुमकीन है या नमकीन है’ हे देशाच्या जनतेने ठरवले आहे. ही दंतकथा नव्हे तर सत्यकथा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा निवडून आले. संजय राऊत, तुमच्या पक्षाची जंतकथा झालेली आहे. पोटातील जंताप्रमाणे तुम्ही वळवळत असल्याचे महाराष्ट्र पहात आहे.
महिला आरक्षणविरोधी भूमिका घेत ते विधायक संसदेत पाडण्याचे काम उबाठा गटाने केले. याबद्दल लाडक्या बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत. रस्त्यावर उतरून त्या तुम्हाला धडा शिकवतीलच आणि येत्या निवडणुकांमध्येही मागच्या विधानसभेप्रमाणे तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय त्या राहणार नाहीत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला.
महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर विरुद्ध दक्षिण हा संघर्ष संजय राऊत आणि इंडिया आघाडीला निर्माण करायचा आहे. या विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होत नव्हता तर उलट दक्षिणेतल्या खासदारांची संख्या वाढणार होती. परंतु तुम्हाला दक्षिणेतल्या राज्यांचे हित नको असल्याने त्या राज्यांची खासदारांची वाढणारी संख्या तुम्ही रोखली आणि या विधेयकाला विरोध करत देशविरोधी भूमिका घेतली, असा आरोप श्री. बन यांनी केला.
