खेड (प्रतिनिधी) : – पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त झालेल्या तळवट ग्रामस्थांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. चिपळूण येथील पाटबंधारे विभाग कार्यालयात जाऊन कुलरमधील पाणी संपवत ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या संतापानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेत तळवट पुनर्वसन गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी (२८) सकाळपासून तळवट गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
धरण दुरुस्तीच्या कामामुळे पुनर्वसित तळवट गावात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाची चर्चा तालुकाभर रंगली होती. ग्रामस्थांच्या संतापाची दखल घेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करत टँकर सुरू केला. अखेर गावात पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाने पुढील काळात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या गांधीगिरीला यश ., तळवट गावात अखेर टँकरने पाणीपुरवठा सुरू !
