मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या घटनेनुसार कोणत्याही पदाधिकाऱ्या किंवा क्रियाशील सदस्याची पक्षातून हकालपट्टी करण्याचे अधिकार पक्ष निरीक्षकांना नाहीत. त्यामुळे पक्षाचे निरीक्षक विजय देसाई यांनी माझ्या हकालपट्टीचे काढलेले पत्र हे अवैध तसेच पक्ष घटनेच्या विरोधात आहे. असे माझे स्पष्ट आणि ठाम मत असून याबाबत मी सन्माननीय पक्ष अध्यक्ष व प्रदेशकडे तक्रार करणार आहे.
​पक्षाचे पदनियुक्त पदाधिकारी व क्रियाशील सदस्यांनी जर पक्षविरोधी कारवाया केले, किंवा पक्षहिताला बाधा येईल असे कृत्य केले, व त्याचे सधार पुरावे उपलब्ध असतील तर संबंधित सदस्या विरोधात पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे जिल्हाध्यक्ष व पक्ष निरीक्षक कारवाईसाठी शिफारस करू शकतात, इतकेच अधिकार पक्ष निरीक्षक व जिल्हाध्यक्ष यांना आहेत.
​पक्षाच्या शिस्तभंग समितीला जर तथ्य आढळले तर समिती संबंधित व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस (शो-कॉज) देऊन त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देते, अथवा आवश्यक वाटल्यास सुनावणी देखील घेण्याची तरतूद आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीने पक्षाच्या ध्येयधोरणा विरोधात कृत्य केल्याचे निष्पन्न झाले तर शिस्तभंग समिती त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची शिफारस थेट प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षाच्या सचिव याना करते व नंतरच कारवाई केली जाते, ही पक्षाची घटना आहे.