खेड (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषद हद्दीतील सुपर मार्केट, खेड बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सुपर मार्केट व हनुमान पेठ या भागातील गटाराच्या कामासाठी रस्त्याची खोदाई करून पाच दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरी गटाराच्या कामाला सुरुवातदेखील झालेली नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, खोदाई केलेल्या भागात पाणी साचत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, शहरवासीयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अर्धवट अवस्थेतील खोदाईमुळे अपघातांना आयते आमंत्रण मिळत आहे. अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? ठेकेदार की वाहनचालक? असा सवाल उपस्थित होत आहे. अपघात झाल्यास वाहनचालकाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिवाय, पाइपलाइन खोदल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन पाणी साचत असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
वास्तविक, गटाराचे काम व पाइपलाइनचे काम तिथल्या तिथेच झाले असते, तर लवकरच गैरसोय दूर झाली असती; पण ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. या मार्केटमध्ये पॅथॉलॉजी लॅब असल्याने लघवी, थुंकी, रक्त तपासणीसाठी येणाऱ्या तसेच गंभीर आजारांचे निदान करण्यासाठी येणाऱ्या वयोवृद्ध महिला व पुरुष रुग्णांचीच नव्हे, तर सर्वच अबालवृद्धांची गैरसोय होत आहे.
याची नोंद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी घेऊन सुपर मार्केटमधील रस्ता खोदाईच्या कामाबरोबरच गटाराचे काम पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.
