चिपळूण (सुनील साळवी): कराची पॅटर्न या नावाने प्रसिद्ध असलेल्या महिलांचे ड्रेस विक्रीसाठी ठेवले आणि मार्केटिंगसाठी तशी रील तयार करून सोशल मीडियामध्ये व्हायरल केली या कारणावरून चिपळूण बाजारपेठेत काल बुधवारी रात्री जोरदार वादंग झाला आणि पालिकेसमोर काही काळ पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.

चिपळूणमधील दोन ड्रेस विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानात वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस विक्रीसाठी ठेवले असून आपल्या दुकानाच्या मार्केटिंगसाठी त्यांनी रील तयार केली. ही रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नागरिकांनी पाकिस्तानी माल विक्रीसाठी का ठेवला? हा माल पाकिस्तानातून आणला का ?अशी संबंधित विक्रेत्याला त्याच्या दुकानात जाऊन विचारणा केली. तेव्हा वाद वाढत गेला आणि गोंधळ निर्माण झाला. परिणामी त्याच्या दुकानाच्या फलकाची तोडफोड झाली असल्याचे वृत्त आहे. ही बातमी चिपळूण बाजारपेठ परिसरात क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अफवांचे पीकही उठले. पोलिसांना कोणीतरी कळविल्यानंतर ताबडतोब मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला. पोलीस बंदोबस्त पालिकेसमोर का ?अशी जो तो विचारणा करू लागला. त्यानंतर प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. रात्री सव्वा अकरा वाजेपर्यंत पोलिस ठाणे आवारात नागरिकांनी गर्दी केली होती.तोपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यामुळे परस्परविरोधी तक्रार दाखल झाली का? तसेच कोणा कोणावर गुन्हा दाखल झाला? का हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्यात आले, याची माहिती समजू शकली नाही. मात्र हे प्रकरण पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हाताळले. रात्री उशिरापर्यंत संबंधित दुकानासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.