अमरावती : नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. नीटसह इतर काही परीक्षांमध्येही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन अभ्यास करतात, मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरत असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. या प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ बदल्या केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांच्या नेतृत्वात ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.