मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना कोणतीही मदत केलेली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका असून कोकणातील शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी आमदार बाळ माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, कोकणातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उद्योगपतींना मात्र मोकळे रान करून दिले जात आहे. शक्तीपीठ महामार्गाची काहीही गरज नसताना आणि कोणीही त्याची मागणी केली नसताना, केवळ लाडक्या उद्योगपतींना गडचिरोलीतील खनिज संपत्ती लुटून थेट गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरळीत वाहतूक करता यावी, यासाठी मध्य भारतातून गोव्यापर्यंत हा महामार्ग आखण्यात आला आहे. या शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे, असेही सपकाळ म्हणाले.