परभणी : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी येथे सुरू असलेल्या आर्थिक व प्रशासकीय अनियमिततांबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी पत्राद्वारे हे निवेदन दिले आहे.

विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भात 8 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्ताचा तसेच शासन निर्णयांचा उल्लेख करून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER), पुणे यांनी संबंधित अनियमिततांचा अहवाल कृषी मंत्रालयाकडे सादर केला असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून नियुक्त्या व पदवाटप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.