खेड (प्रतिनिधी) :.- महाराष्ट्र शासनाने नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कृत्रिम वाळू अर्थात एम-सॅन्ड (क्रश सॅन्ड) उद्योगाला प्राधान्य देत महत्त्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात सार्वजनिक तसेच खासगी बांधकाम प्रकल्पांमध्ये एम-सॅन्डच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असून पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर आहे.
याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वेरळ येथे युवा उद्योजक अनिकेत सदानंद कदम यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले ‘साई क्रश सॅन्ड’ हे जिल्ह्यातील पहिले एम-सॅन्ड प्रकल्प ठरत आहे. या प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्राला वर्षभर दर्जेदार आणि टिकाऊ वाळू उपलब्ध होत असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही मोठी चालना मिळत आहे.