चिपळूण : विक्रांत आलेकर व प्रसाद आलेकर या २ बंधूंनी २०२२ साली सुरू केलेल्या कोकणातील पहिल्या चिपळूण–पंढरपूर सायकल वारीने यंदा यशस्वी चौथ्या वर्षात पदार्पण केले. पहिल्या वर्षी अवघ्या १८ सायकलपटूंनी सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदा तब्बल ३३ सायकलपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये चिपळूण सायकलिंग क्लबचे २८ तर दापोली सायकलिंग क्लबचे ५ सायकलपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यावर्षी ९ महिला सायकलपटूंनीही वारीत सहभाग नोंदवत हा उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरविला.

भक्तिमय वातावरण, अभंग, टाळ-मृदुंगाचा गजर, आरती आणि शिस्तबद्ध नियोजनाच्या साक्षीने १० जुलै २०२६ रोजी सकाळी चिपळूण येथून वारीला प्रारंभ झाला. दोन दिवसांचा प्रवास पूर्ण करत ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पंढरपूर येथे वारीची सांगता झाली.

वारीच्या पहिल्या दिवशी सायकलपटूंनी चिपळूण–कराड–विटा असा सुमारे १४० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, तर दुसऱ्या दिवशी विटा–पंढरपूर हा ११० किलोमीटरचा टप्पा यशस्वीरित्या पार करत एकूण २५० किलोमीटरचे अंतर सायकलवर पूर्ण केले. संपूर्ण वारी अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या वारीमध्ये सहभागी महिला वर्गाने नववारी साडी परिधान करून सायकल चालवली आणि महिलांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहित केले.

या वारीदरम्यान अखिल भारतीय सायकल वारी समिती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ९० दिवसांच्या विशेष सायकलिंग चॅलेंजमध्ये चिपळूण सायकलिंग क्लबच्या ३५ हून अधिक सायकलपटूंनी सहभाग नोंदविला होता. या चॅलेंजमध्ये क्लबचे अध्यक्ष प्रशांतजी दाभोळकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सातवा क्रमांक मिळविल्याने त्यांचा समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, सायकल वारी आणि ९० दिवसांच्या चॅलेंजमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबचाही विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान क्लबचे अध्यक्ष या नात्याने प्रशांतजी दाभोळकर यांनी स्वीकारला.