चिपळूण : रत्नागिरी व देवगड हापूसची ओळख आणि प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्या प्रकारांविरोधात आता आवाज उठू लागला आहे. बाजारपेठेत मद्रासचा आंबा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी तथा पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केला आहे. या प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुकादम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही परप्रांतीय विक्रेते बाजारपेठेत मद्रासचा आंबा हापूस असल्याचे सांगून विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असून स्थानिक हापूस विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. ग्राहक व स्थानिक व्यापाऱ्यांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.
हापूसच्या नावाखाली दुसऱ्या जातीचा आंबा विकणे ही ग्राहकांची सरळ फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मद्रासचा आंबा विकण्यास बंदी नाही, मात्र त्याला हापूस म्हणून विक्री करणे चुकीचे असून अशा प्रकारामुळे रत्नागिरी-देवगड हापूसच्या गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होऊन बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हापूसच्या नावाखाली मद्रास आंब्याची विक्री कृषी विभागाने कारवाई करावी : शौकतभाई मुकादम
