सांगली – “मी सांगलीचा आहे. माझ्या चळवळीची सुरुवातही सांगलीतूनच झाली. या सांगलीने मला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. तिसऱ्यांदा मी राज्यसभेवर निवडून आलो आहे. सांगलीचे ऋण फेडण्यासाठी मंत्रिपदाचा लाभ येथे कायम देईन,” दलित मराठा यांना जोडण्यासाठी सामाजिक ऐक्य साधणे हेच आपले उद्दिष्ट्य आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगली येथे दिले.
आठवले तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर, आदर्श सरपंच भीमराव माने, काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जैन सभेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील, प्रा. सीमा आठवले आणि कार्यक्रमाचे संयोजक राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक विठ्ठल पाटील, गगनराज पाटील उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीला आठवले यांनी आपल्या शैलीत चारोळ्या सादर करत सांगलीचे कौतुक केले.
