रत्नागिरी : चिपळूण येथील १४ वर्षाच्या शाळकरी मुलीला पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी संदेश सोमा बारे रा. गोंधळे, ता. चिपळूण यास चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि रु. ५० हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा न्यायालयाने आदेश केला.
या सत्र खटल्याची सुनावणी चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर सुरु होती. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, गुन्ह्याचे तपास अधिकारी यांच्यासह एकूण १० साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी घेतली. या कामी सरकारी वकील यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद मांडला व त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी संदेश सोमा बारे यास विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी भा.दं.वि. कलम ३७६, ३६३ तसेच पोक्सो कायदा कलम ४, ८ अन्वये दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंड भरल्यास ही दंडाची सर्व रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला.