मंडणगड : उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच या समस्या राज्य शासनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तोडगा काढता यावा, या उद्देशाने दापोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले होते.
या अभियानाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) संतोष साखरे तसेच भाजपा आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी भाजपा मंडणगड तालुका अध्यक्ष दत्ताजी महाडीक यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वीराज चव्हाण, आनंद नारकर, आकाश नाविलकर, रामदास भागडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार प्रमोद जठार यांची भेट घेतली. मंडणगड तालुक्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर निवेदन आमदार जठार यांच्याकडे सादर करण्यात आले.
तालुक्यातील विकासकामांना गती मिळावी, नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागाव्यात आणि आवश्यक त्या कामांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या समस्या व विकासकामांबाबत लवकरच योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, भाजपा जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जया साळवी, भाजपा ग्रामविकास व पंचायत राज सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.