मंडणगड : सातेरे तर्फे नातू व जामगे या दापोली तालुक्यातील दोन गावांचे हद्दीत मंडणगड तालुक्यातील शेडवई येथील महेश बारस्कर व धनराज बारस्कर यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेत पाचशेहुन अधिक वनवृक्षाची वृक्षलागवड करण्यात आली. वनविभाग दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नुकतीच यशस्वी करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील शेतकरी गजानन पवार, मंदा आखाडे, पांडुरंग हिरवे आणि दिनेश चाफे यांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये साग, खैर, जांभूळ, शिसम, आवळा, काजू आणि आंबा आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षलागवडीमुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही हातभार लागणार आहे. तसेच फळझाडांमुळे भविष्यात शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्यासाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. ‘वृक्षलागवड ही काळाची गरज असून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात जास्तीत जास्त झाडे लावावीत,’ असे आवाहन यावेळी करण्यात आले.
