मंडणगड : अडखळ येथील जिल्हा परिषद शाळेतील पूर्णवेळ शिक्षकाला शेजारील टाकवली गावात पंधरा दिवसांच्या कामगिरीवर पाठविण्यात आले. मात्र, एक महिना उलटूनही संबंधित शिक्षक मूळ शाळेत परत न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार अडखळ येथील महिलांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे शुक्रवारी (ता. २१) केली.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दीप्ती इप्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडखळ येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत एकूण २६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत तीन शिक्षक कार्यरत असताना त्यापैकी एका शिक्षकाला सुमारे महिनाभरापूर्वी टाकवली येथे १५ दिवसांच्या मुदतीसाठी कामगिरी शिक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. मात्र, मुदत संपून एक महिना उलटला तरी संबंधित शिक्षक अद्याप मूळ शाळेत परतलेले नाहीत. त्यामुळे उर्वरित दोन शिक्षकांवर पहिली ते सातवीचे सर्व वर्ग सांभाळण्याची जबाबदारी येत असून, विद्यार्थ्यांना अध्यापन करणे कठीण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. कामगिरीवर पाठविण्यात आलेल्या शिक्षकाला तातडीने अडखळ शाळेत परत पाठवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी पंचायत समिती शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरावरील अधिकारी बैठकीसाठी रत्नागिरी येथे गेल्याने महिलांना संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे या समस्येवर तत्काळ कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
यावेळी अडखळ येथील सौ. कशिश भोई, संजना डेरे, अन्यया महाडीक, प्रगती हरावडे, स्वाती हरावडे तसेच शिक्षणप्रेमी नागरिक दत्ताजी महाडीक उपस्थित होते.
अडखळ शाळेतील शिक्षक महिनाभरापासून कामगिरीवर; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान..
