चिपळूण (विशेष प्रतिनिधी)- शहराजवळच्या वालोपे गणेशवाडी येथे गुरुवारी सायंकाळी नदीकिनारी मगरीच्या जबड्यात अडकलेल्या आपल्या आईची थरारक सुटका करणाऱ्या स्वर्णी भूपेंद्र पवार या 10 वर्षीय बालिकेचा जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण या संस्थेतर्फे तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
कुमारी स्वर्णी हिची आई सौ. नंदिनी पवार (३५) या कपडे धुण्यासाठी गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी वालोपे नदीकिनारी गणेश घाटावर गेल्या होत्या. त्या कपडे धुवत असतानाच दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना पाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे सौ. पवार बचावासाठी आरडाओरड करू लागल्या. आणि त्यांनी एका हाताने दगडाला धरून ठेवले. तर दुसरीकडे मगर त्यांना पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत होती.
ही घटना घडतेवेळी कुमारी स्वर्णी ही देखील तिथे होती. तिने ताबडतोब सर्व शक्ती एकवटून आपल्या आईचा हात पकडला आणि तिला ताकदीनिशी बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. सोबतच नंदिनी यांनीही मगरीसोबत झटपट सुरु केली. अखेर मगरीच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. अशाप्रकारे स्वर्णी या चिमुकलीने आपल्या आईचे प्राण वाचविले. तिच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठी जर्नालिस्ट असो. चे अध्यक्ष, दैनिक सागरचे पत्रकार सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष गजेंद्र खडपे, खजिनदार संतोष पिलके, सदस्य ललेश कदम यांनी तिच्या घरी जाऊन भेटवस्तू आणि रोख बक्षीस देऊन तिचे कौतुक केले. यावेळी स्वर्णी हिने प्रसंग कसा घडला आणि आपण आईला कशा पद्धतीने वाचवले हा अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगितला.
