मुंबई : गणेशमूर्ती तयार करण्यापासून ते त्यांचे विसर्जन, गणेशोत्सवातील सजावट, रोषणाई आणि उत्सवाच्या विविध परंपरांवर सातत्याने आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींपासून मुंबईकरांनी सावध राहावे, अशा पध्दतीने आक्षेप घेणारे दिमागी नक्षली’ सोबत आदित्य ठाकरे यांचा संवाद वाढलाय का? असा थेट सवाल भाजप नेते तथा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे.
पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेले निर्देश कायम ठेवले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेला न्यायालयीन मान्यता मिळाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री शेलार.यांनी. आभार मानले आहेत. या लढाईत गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना, उत्सव समिती, समन्वय समिती, गणेशोत्सव मंडळे या सगळ्यांनी लढाई एकत्रितपणे लढले त्याबद्दल त्यांचे ही मंत्री शेलार यांनी आज घेतल्या पत्रकार परिषदेत आभार मानले.
“गणेशमूर्तीला कोणता रंग लावावा, मूर्तीचे विसर्जन कसे करावे, मूर्ती पर्यावरणाला कशी हानिकारक आहे, सणासुदीच्या काळातील रोषणाई आणि सजावट कशी असावी, अशा अनेक बाबींवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. या सगळ्या मांडणीच्या आधारे न्यायालयात दावे दाखल केले जातात. गणपतीच्या मूर्ती बनवणे, त्यांचे प्रदर्शन व विक्री करणे, सजावट करणे, उत्सव साजरा करणे आणि विसर्जन करणे यावर कायदेशीर मर्यादा आणण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याबाबत नागरिकांनी सजग राहिले पाहिजे,” असे शेलार म्हणाले.
भाजप २०१३ पासून गणेशभक्त, मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या प्रश्नांसाठी लढत असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करताना गणेशोत्सवाच्या परंपरेला धक्का लागू नये, अशी पक्षाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंना थेट सवाल
या मुद्द्यावरून शेलार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “मुंबई महापालिकेत २०१८ मध्ये गणेशमूर्तीकारांमध्ये विभागणी करण्याची भूमिका सर्वप्रथम तुम्ही घेतली. शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि पीओपी मूर्ती असा भेद करण्यामागचे कारण काय?” असा सवाल त्यांनी केला.
लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईतील अन्य पारंपरिक गणेशमूर्ती कशा पद्धतीने तयार होतात, त्यांची परंपरा काय आहे, याची कल्पना आदित्य ठाकरे यांना आहे का? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.
“या मूर्तींच्या विसर्जनाबाबत जे न्यायालयात गेले, त्यांच्या भूमिकेविरोधात तुम्ही आवाज का उठवला नाही? तुमचा या प्रवृत्तींशी काही संबंध आहे का? या लोकांशी तुमची चर्चा होते का? मुंबईतील पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अडथळा निर्माण करणाऱ्यांशी तुमचा साटेलोटा तर नाही ना?” असा थेट सवाल शेलार यांनी केला.