रत्नागिरी : ‘ही भूमी पावन आणि ऐतिहासिक आहे. प्रेरणा आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या कसबा भूमीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जावे, ही स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची इच्छा आहे. या स्मारकाच्या कामाची सुरुवात, निधी आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच हे भव्य स्मारक साकार होईल,’ अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

कसबा (संगमेश्वर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आणि नियोजित आराखड्याची पाहणी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत, प्रशांत यादव, वैभव खेडेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार म्हणाले, ‘या स्मारकाच्या संदर्भात आमदार प्रमोद जठार यांनी माझ्या विभागात महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. तसेच, राज्याचे मंत्रिमंडळातील सदस्य तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनीही विधिमंडळात या स्मारकाबाबत सकारात्मक घोषणा केली होती. त्यानुसार आता स्मारकासाठीचा निधी आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्णत्वास येत असून, कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठीच मी आज या पवित्र भूमीत आलो आहे.’