रत्नागिरी : जिल्ह्यातील गोविंदा पथके दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ५ सप्टेंबरला दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात यंदा सार्वजनिक २८५ आणि खासगी २ हजार २९३ अशा एकूण २ हजार ५७८ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक दहीहंड्यांच्या संख्येत १८७ ने घट झाली आहे; मात्र, खासगी दहीहंड्यांमध्ये १५ ने वाढ झाली आहे.

दहीहंडीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष आणि मंडळांकडून आकर्षक तसेच लाखो रुपये किमतीची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे दहीहंडी फोडण्याबरोबरच मोठी बक्षिसे पटकावण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उत्सवाची तारीख जवळ येत असल्याने जिल्ह्यातील विविध गोविंदा पथकांचा सरावही जोरात सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागात दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. काही ठिकाणी सात ते आठ थरांची दहीहंडी उभारली जाणार आहे. उंच हंडी फोडण्यासाठी स्थानिक गोविंदा पथकांसह जिल्ह्याबाहेरील पथकेही सहभागी होतात. त्यामुळे यंदाही दहीहंडीच्या थरांचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दहीहंडीच्या थरांची उंची आणि गोविंदा पथकांची कसरत याबरोबरच बक्षिसांच्या रकमेमध्येही स्पर्धा रंगली आहे. विविध मंडळे आणि राजकीय पक्षांकडून रोख रक्कम, आकर्षक भेटवस्तू आणि इतर पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.