आबलोली : काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आज गुहागर तालुका युवासेनेच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना उबाठाचे शहरप्रमुख राज विखारे यांनी भाजपचे निलेश सुर्वे यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत.
राज विखारे यांनी थेट पुरावा सादर करत भाजपवरच पलटवार केलाय. गुहागरमधील एमआयडीसी ही आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे नाही, तर भाजपचे नेते विनय नातू यांच्या मागणीमुळेच रद्द झाली, असा खळबळजनक दावा विखारे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जाहीर सभेतील वक्तव्याचा दाखला दिला. उदय सामंत यांनी शृंगारतळी येथील सभेत स्वतः कबूल केलं होतं की, विनय नातू आणि स्थानिक शिवसेनेच्या मागणीवरूनच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एमआयडीसी तात्काळ रद्द करण्यात आली होती..
जर एमआयडीसी तुमच्याच नेत्यांच्या सांगण्यावरून रद्द झाली तर मग आमदार भास्कर जाधव यांच्या नावाने बोंबा का मारता? असा संतप्त आणि रोखठोक सवाल राज विखारे यांनी भाजपला विचारला आहे.