पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार मिळतील आणि तुमच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या वतीने साने गुरुजी स्मारक सभागृहामध्ये आयोजित राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व या परिषदेचे संयोजक ॲड. डॉ. अरुण जाधव स्वागताध्यक्ष तथा भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम, ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाने, ॲड. अरविंद तायडे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. दीपा राजमाने, उमाताई जाधव अंबरसिंग चव्हाण यांच्यासह वासुदेव, गोंधळी, बहुरूपी, रायरंद, मरीआईवाले, इत्यादी पारंपरिक लोक कलावंत भटक्या मुक्त जाती जमाती मधील विविध संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होतेय.
यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, आपल्या विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणायची असेल तर प्रत्येकाने आपल्या गावागावात जाऊन निवडणुकीच्या वेळी मी माझ्या मताची किंमत करणार नाही, स्वतःला विकणार नाही आणि दुसऱ्यालाही विकू देणार नाही असा निर्धार केला पाहिजे. आपण जर आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या हक्काची भाकर खात असू तर मग आपण स्वाभिमानाने जगले पाहिजे. दुसऱ्यांची गुलामगिरी व लाचारी न पत्करता आपला स्वाभिमान जिवंत ठेवला पाहिजे.
यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी 1990 साली काढलेल्या ‘बिऱ्हाड मोर्चा’ची आठवण करून दिली. ते म्हणाले की, त्यावेळी आम्हाला मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी अडवले, त्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आमच्या वकिलांनी याचिका दाखल केली आणि केवळ हॅबिट्युअल अॅक्ट नुसार कुणाला गुन्हेगार ठरवता येणार नाही असे ठणकावून सांगितले. त्यामुळे तो कायदा रद्द झाला. कोर्ट एखादा कायदा रद्द करू शकते. मात्र नवीन कायदे करायचे असतील तर ते विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहातच करता येतात. त्यासाठी आपल्याला आपले हक्काचे प्रतिनिधी असले पाहिजे असे ते म्हणाले.
ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, भटके विमुक्त समाजाला माणसासारखे स्वाभिमानी जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी आपण मागच्या महिन्यात राज्यभर ‘मुसाफिर यात्रा’ करून सर्व भटके मुक्तांना एकत्र केले. त्यांच्यामध्ये जनजागृती केली. त्याचबरोबर पुणे येथे राज्यस्तरीय भटके मुक्त परिषदेचे आयोजन केले. त्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा पिंजून काढला. त्यासाठी भटक्या विमुक्तांच्या पाला पालावर जाऊन त्यांना माहिती दिली. त्यावेळी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की पुण्यात भटके मुक्तांची परिषद कशासाठी ? तर आम्ही म्हणतो आमचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या शिकवणुकीचे आम्ही आचरण करतो. स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी भटके मुक्तांना अजूनही आपल्या हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही. भारतीय संविधानाने दिलेला हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी पुन्हा एकदा भटकेमुक्तांनी रस्त्यावर उतरून ही लढाई जिंकावी लागेल. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवून ती जिंकली पाहिजे. तरच आपला आवाज बुलंद होऊ शकतो असे ते म्हणाले.
