मुंबई : रोमन लिपी ही मराठी भाषेची लिपी असल्याचा जावईशोध लावणाऱ्या संजय राऊत यांचे मराठीप्रेम निव्वळ बेगडी आहे. दररोज सकाळी पत्रकार परिषदेतील त्यांची एकंदर भाषा पाहता त्यांच्या मराठीचा आणि राजकारणाचाही स्तर किती खालावला आहे हे आपल्या लक्षात येते, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी राऊत यांच्यावर सणसणीत टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी उपस्थित होते.
श्री. बन म्हणाले की, गेल्या पंधरा-वीस वर्षापासून संजय राऊत सामनाचे संपादक म्हणवून घेतात. मराठी भाषेचा पुळका आपल्यालाच असल्याचा दावा ते सातत्याने करतात. लोकांना शब्दालंकार पुस्तके वाचण्याचे सल्ले देतात आणि आज मराठी भाषेची लिपी रोमन लिपी असल्याचा जावईशोध त्यांनी लावला. ‘देवनागरी’ ही मराठी भाषेची लिपी असल्याचे महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. रोमन आणि देवनागरी लिपी वेगवेगळी असल्याची साधी माहिती त्यांना नाही की जाणीवपूर्वक मराठीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे? असा सवाल उपस्थित करत कदाचित याचमुळे उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्य संपादक करण्याऐवजी कार्यकारी संपादक ठेवणे पसंत केले, असा टोलाही श्री. बन यांनी लगावला.
रोमन ही मराठीची लिपी असल्याचा जावईशोध लावणाऱ्या संजय राऊतांचे मराठीप्रेम बेगडी – नवनाथ बन यांची सणसणीत टीका
