मुंबई : मीरा रोड येथे धर्म विचारून सुरक्षारक्षकाला झालेल्या मारहाणीबाबत बोलताना जनाब संजय राऊत यांनी ‘धर्म विचारून मारहाण तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये केली जाते’, असे धक्कादायक विधान केले. संजय राऊत, अशी मुक्ताफळे उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का? असे वादग्रस्त विधान करून तुम्ही हिंदूंची बदनामी करत आहात. आजवर कुठल्या हिंदूंनी धर्म विचारून अन्य धर्मियांवर हल्ले केले याचे एकतरी उदाहरण द्याल का, असा घणाघाती सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.

भाजपा सातत्याने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रावर अवलंबून राहत असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, जेव्हा जेव्हा विधान परिषद, राज्यसभा निवडणुक येते तेव्हा सर्व समाजघटकांना संधी मिळाली पाहिजे असा भाजपाचा प्रयत्न असतो. तळागाळात काम करणाऱ्या, वर्षानुवर्षे भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात अशा सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपाने सातत्याने केला. याही विधान परिषदेच्या यादीवर नजर टाकली तर ते लक्षात येईल.