मुंबई : जनाब संजय राऊत तुम्ही आता ‘संपत राऊत’ झालेले आहात याचे भान ठेवा. भाजपा अडचणीत नाही तर उबाठा गट अडगळीत पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा, तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाची वाटचाल अतिशय सुरळीतपणे सुरू आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण सर्व निर्णय घेण्यासाठी अतिशय सक्षम आहेत. त्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय चाललेय हे शोधण्यापेक्षा आपल्या अडगळीत पडलेल्या पक्षाकडे लक्ष द्या, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला.
सांगलीमध्ये कोणाचे नेतृत्व सक्षम आहे, याचा निर्णय सांगलीकरांनी घेतला आहे . जयंत पाटील यांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा आमचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत जयंत पाटील यांच्यावर केलेले भाषण ऐका. आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात सांगली – मिरज हा रस्ता करता आला नाही त्यांनी सांगलीचे नेतृत्व करू नये, असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. तुम्ही कितीही कोणाला प्रमाणपत्र दिले, तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही, असे श्री. बन यांनी सुनावले.
लाडकी बहिण योजनेत जे पुरुष पैसे घेत होते अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, संजय राऊत यांना एवढेच सांगायचे आहे की, महाविकास आघाडीत असताना तुम्हीही लाडक्या बहिणी योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी कॅम्प आयोजित केले होते. लाडक्या बहिणी योजनेला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वाधिक बोगस लाभार्थी हे उबाठा गटाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या कॅम्पमधून भरले गेल्याने जवळपास 93 लाख बोगस लाभार्थी समोर आले. संजय राऊत, तुम्ही उच्च न्यायालयात जाण्याची धमकी देत आहात आणि ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहात. तुम्ही लाडक्या बहिणी योजनेला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरीही ही योजना बदलणार नाही आणि बंदही पडणार नाही. उलट, लाडकी बहिण योजनेत बोगस लाभार्थी घुसवल्याबद्दल सच्च्या लाडक्या बहिणी तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. त्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवतील.