खेड :- येथील खेड – शिवतर रोड श्रीभैरी भवानीनगर मंदिरात अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी होणा-या प्रकटदिन सोहळ्याच्या विविध कार्यक्रमाबरेबरच शनिवार दि.२१ मार्च २०२६ रोजी पालखी परिक्रमा सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी या वाजतगाजत, लेझीमच्या तालावर, चित्ररथ, उंट, हत्तींच्या सहभागाने मंगलमय आणि शांततेच्या वातावरणात निघणा-या ” न भूतो न भविष्य ” अशा पालखी सोहळ्यात सर्वच महिला स्वामी भक्तांनी भगवी साडी तर पुरुष भक्तांनी पांढरा झब्बा लेहेंगा असा पारंपरिक पद्धतीचा वेष परिधान करून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे. असे भक्तिमय आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी ६ – श्रींचे पूजन.,सकाळी ७ – श्रींचे जन्मोत्सव किर्तन.,सकाळी ९ ते दुपारी १२ वाजता लघुरुद्र., दुपारी १२:३० – श्रींचा मुखवास.,सायंकाळी ४ – दिंडी सोहळा., सायंकाळी ५:३० – मंदिर परिसरात सवाद्य पालखी परिक्रमा सोहळा.,सायंकाळी ७ – आरती आणि सायंकाळी ७ ते रात्री १० – महाप्रसाद व संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. शनिवार दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मंदिरातून पालखीचे सवाद्य प्रस्थान होणार असून हि पालखी महात्मा फुले नगर मार्गे – छत्रपती शिवाजी महाराज चौक – वाणीपेठ – गांधी चौक – पानगल्ली -गुजरआळी – पावसकर नाका – सोनार आळी-बाजारपेठ-हनुमान पेठ-कोष्टी आळी -संत रोहीदास नगर – संतसेना नगर -योगायोग सोसायटी मार्गे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर श्रीभैरी भवानीनगर खेड येथील मंदिरात पालखी येऊन रात्री ९ वाजता भोजनाच्या कार्यक्रमाने प्रकट दिन व पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
श्रींना २१०० पुरण पोळींचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. तरी ज्या स्वामीभक्तांना पुरणपोळी द्यावयाची आहे त्यांनी मंदिरामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत जमा कराव्यात अशी विनंती संयोजकांकडून करण्यात आली आहे. अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे संदीप सासने, दिवाकर नांदगावकर, गुणाजी खेडेकर, वैभव जंगम, मंगेश पवार,बाळु वर्मा, उल्हास शेलार यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.