चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे गावातील सुतारवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या नळपाणी योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर त्यांनी ग्रामस्थांसह चिपळूण पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांची भेट घेत प्रशासनाला जाब विचारला.
मुर्तवडे सुतारवाडी येथे सुमारे तीन वर्षांपूव जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 51 लाख रुपयांची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या कामाचा ठेका आशिष वसंत मोहरेकर यांना देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत केवळ विहिरीचा खड्डा करण्यात आला असून पाण्याची टाकी अर्धवट अवस्थेत आहे. तसेच जलजीवन मिशनचे पाईप गावात फक्त टाकून ठेवण्यात आलेले असून योजना आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याहून गंभीर बाब म्हणजे काम पूर्ण न होता देखील संबंधित ठेकेदाराने सुमारे 41 लाख रुपयांचे बिल उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी सुतारवाडीतील नागरिकांना अद्याप नळपाण्याचा लाभ मिळालेला नाही. गावकऱ्यांना नदीतील मळकट व अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ येत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी शिवानी सावंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालय गाठले. यावेळी गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत उद्या प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच सोमवारी जलसिंचन विभागाचे डेप्युटी इंजिनिअर, संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न निकाली काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य शिवानी सावंत यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जलजीवन मिशन ही केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून स्थानिक पातळीवरील हलगजपणामुळे ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळत नाही. दोषींवर तात्काळ कारवाई करून योजना लवकरात लवकर पूर्ण करावी, अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
मुर्तवडेतील जलजीवन मिशन योजनेवरून जिप सदस्या शिवानी सावंत आक्रमक गटविकास अधिकाऱ्यांची भेट; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
