चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या चिपळूण तालुक्यातील नवीन कोळकेवाडी येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा गेली ५२ वर्षे प्रलंबित असलेला शेतजमिनीचा प्रश्न आणि ‘नवीन कोळकेवाडी’ गावाच्या महसुली नोंदीतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याच्या मागणीला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे *आमदार शेखर गोविंदराव निकम यांनी महसूल मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळेस साहेब यांची भेट घेऊन दोन्ही विषयांबाबत सविस्तर निवेदने सादर केली. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी कोकण आयुक्तांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आमदार निकम यांनी सादर केलेल्या निवेदनात नवीन कोळकेवाडी येथील ६१ विस्थापित कुटुंबांचे पुनर्वसन झाल्यानंतरही त्यांना अद्याप नियमानुसार शेतीयोग्य जमीन मिळालेली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार केवळ ५० कुटुंबांना कागदोपत्री पर्यायी जमिनीचे वाटप दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ४७ कुटुंबांना नियमापेक्षा कमी म्हणजेच केवळ दोन एकर जमीन मिळाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. त्याच वेळी शहापूर येथे पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी चार एकर जमीन देण्यात आल्याचे उदाहरण देत समान न्याय देण्याची मागणी करण्यात आली. पर्यायी जमीन उपलब्ध करून द्यावी किंवा त्याऐवजी कायदेशीर आर्थिक पॅकेज मंजूर करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनाची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी कोकण आयुक्तांना शासन स्तरावर २१ दिवसांच्या आत बैठक आयोजित करून विषयावर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर निर्णय प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच भेटीत आमदार निकम यांनी नवीन कोळकेवाडी गावाच्या महसुली नोंदीतील तांत्रिक त्रुटीचाही मुद्दा मांडला. सन १९७३ मध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून स्थापन करण्यात आलेल्या या गावाला १९९२ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. मात्र, राजपत्रातील नोंदीमध्ये गावाचे नाव केवळ ‘कोळकेवाडी’ असे नमूद झाल्याने एकाच तालुक्यात एकाच नावाची दोन गावे अस्तित्वात आली असून महसुली व्यवहार, दाखले आणि अन्य प्रशासकीय कामांमध्ये ग्रामस्थांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
