देवरुख : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता ग्राहकांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे आणि विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, शाखा प्रबंधक श्री. गौरवसिंह, यांनी केले
बँक ऑफ इंडिया, देवरुख शाखेतर्फे काटवली ग्रामस्थांना व हातीव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्राहकांसाठी दक्षता व सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात बँक ऑफ इंडिया देवरुख शाखेचे शाखा प्रबंधक गौरवसिंह, बँक अधिकारी सौ. पायल नागतोडे आणि वैभव देशमुख यांनी उपस्थित ग्राहकांना आर्थिक तसेच डिजिटल फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सध्या मोबाईल, इंटरनेट बँकिंग, UPI, QR कोड तसेच विविध डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक, बनावट APK फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडणे, फसव्या लिंक पाठविणे, बनावट KYC अपडेट, OTP व PIN मिळविण्याचे प्रयत्न, फिशिंग मेसेज, बनावट फोन कॉल, UPI फसवणूक, QR कोडच्या माध्यमातून होणारी फसवणूक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
विविध प्रत्यक्ष उदाहरणे, जनजागृतीपर कथा आणि प्रसंगांच्या माध्यमातून ग्राहकांना फसवणुकीच्या पद्धती समजावून सांगण्यात आल्या. बँक कर्मचारी किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोनवरून OTP, ATM PIN, CVV, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा UPI PIN मागत नाही, त्यामुळे अशी गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीस देऊ नये, असा महत्त्वाचा संदेश यावेळी देण्यात आला.
तसेच अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये, अनोळखी APK किंवा मोबाईल ॲप डाउनलोड करू नये, संशयास्पद फोन कॉलला प्रतिसाद देऊ नये आणि कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे ट्रान्सफर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोणतीही सरकारी यंत्रणा नागरिकांना व्हिडिओ कॉलवर ठेवून पैसे मागत नाही, याबाबतही विशेष जनजागृती करण्यात आली.
सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तक्रार नोंदवावी, तसेच आवश्यक असल्यास सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाला हातीव व काटवली परिसरातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित ग्राहकांनी बँक ऑफ इंडियातर्फे ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. डिजिटल व्यवहार करताना अधिक दक्षता बाळगण्याचा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही सायबर फसवणुकीबाबत जागरूक करण्याचा संकल्प ग्राहकांनी व्यक्त केला.
ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता ही बँकेची महत्त्वाची जबाबदारी असून, सुरक्षित डिजिटल बँकिंगबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बँक ऑफ इंडिया रत्नागिरी झोनच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी सातत्याने जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यासाठी बँकेकडून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
