लांजा : तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक हेच आपले प्राधान्य आहे. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. राजकारण बाजूला ठेवून जनहिताच्या कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी केले.

लांजा शहरातील पाटीदार भवन येथे बुधवारी आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लांजा तालुक्याच्या आमसभेत ते बोलत होते. विशेष म्हणजे, पहिल्याच आमसभेत सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यांनी विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी आमदार सामंत यांनी प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या. त्यामुळे ही आमसभा विविध विषयांवरील सविस्तर चर्चेने आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.

सभेच्या प्रारंभी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. सभेत तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा, एसटी बससेवा, जमीनविषयक समस्या, भूमिअभिलेख कार्यालयातील तक्रारी, लांजा नगरपंचायतीची विकासकामे तसेच अवैध दारू व्यवसाय अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

👉🏻विरोधकांच्या प्रश्नांनाही दिली सकारात्मक उत्तरे!

आमसभेत विरोधी गटातील सदस्यांनी काही प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. मात्र, आमदार किरण सामंत यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जागेवरच माहिती घेत प्रश्नांची वस्तुस्थिती समजून घेतली. जनतेच्या हिताच्या दृष्टीने मांडण्यात आलेल्या विधायक सूचनांचे स्वागत करत त्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

👉🏻विकासकामांसाठी कालमर्यादा निश्चित करा!

तालुक्यातील प्रलंबित विकासकामे केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात पूर्ण झाली पाहिजेत. प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारीतील कामांचे नियोजन करून निश्चित कालमर्यादेत ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांची तातडीने सोडवणूक करावी. जनतेच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ सहन केली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना आमदार सामंत यांनी प्रशासनाला दिल्या.

👉🏻राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य!

मतदारसंघाचा विकास करताना कोणताही राजकीय भेदभाव केला जाणार नाही. जनतेच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधकांनाही पूर्ण संधी आहे. विकासाच्या बाबतीत सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. लांजा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत विकासकामे पोहोचविणे आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविणे हेच आपले ध्येय असल्याचे आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लांजा नगरपंचायतीसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किरण सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव आमसभेत करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोलकर, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चालके, नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, प्रश्नांची केवळ चर्चा न करता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा आग्रह धरणारी आणि सत्ताधारी-विरोधकांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग पुढे नेणारी आमदार किरण सामंत यांची ही पहिलीच आमसभा लक्षवेधी ठरली.