रायगड : नेपाळमधील काठमांडू युनिव्हर्सिटी, धुलीखेल येथे ३० एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत पार पडलेल्या ‘७ व्या आशियाई व इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी दैदीप्यमान कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. या स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या (MBMA) आणि महाराष्ट्राच्या सर्व विजयी खेळाडूंचा मंगळवार,दि ५ मे २०२६ रोजी सायंकाळी पनवेलमध्ये भव्य सत्कार समारंभ व पत्रकार परिषद उत्साहात पार पडली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून एकूण ७१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये महाराष्ट्रातील २४ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत २ सुवर्ण, ७ रौप्य आणि १५ कांस्य पदके जिंकली. विविध राज्यातील खेळाडूंच्या एकत्रित योगदानामुळे भारताने आशियाई स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावण्याचा बहुमान मिळवला. महाराष्ट्राच्या गार्गी कुलकर्णी आणि अंजली चव्हाण यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर आकांक्षा भालेकर, आर्या पवार, समृद्धी जुगदार, शिवम पाटील, श्रुतिका जाधव, वैष्णवी शिंदे आणि सार्थक महामुनी यांनी रौप्य पदके पटकावली. तसेच ऐश्वर्या नायक, अस्मि पाटील, वरद शेटे, मकरंद जुगदार, ध्रुव दिघाडे, अविर बनसोडे, प्रमोद ठोंबरे, आदित्य खंडीझोड, यश मोरे, ध्रुव कोलतेकर, ईश्वरी डेरे आणि स्वयम् शिंदे यांनी कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उंचावले. ‘हिमालयन इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिप’ मध्ये सिद्धी जोगदार, मंथन रोटे आणि आराध्या भोसले यांनी कांस्य पदकाची कमाई केली.
सीकेटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात अकॅडमीच्या खेळाडूंचे टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषात स्वागत करण्यात आले. या यशानंतर खेळाडूंची भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सत्कार समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रशिक्षक आणि खेळाडूंनी आपले अनुभव मांडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आलेले दडपण आणि त्यावर मात करून मिळवलेले यश हा प्रवास अत्यंत कठीण पण प्रेरणादायी असल्याचे खेळाडूंनी सांगितले.
या यशात खेळाडूंसोबतच प्रशिक्षक आणि पंचांचेही मोठे योगदान राहिले. राष्ट्रीय संघ प्रशिक्षक सुहास धाईंजे, आशिया पंच राहुल पवार आणि भूपेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हा विजय साकारला. तसेच भूपेंद्र शिवाजी गायकवाड, धनेशा शिंगोटे, राहुल पवार आणि सुशांत पोळ यांनी जज व रेफ्री म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.
आशियाई स्तरावरील या घवघवीत यशानंतर आता भारतीय खेळाडूंचे लक्ष्य सप्टेंबर २०२६ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या सवात वर्ल्ड चॅम्पियनशिप’ कडे लागले आहे. “आता आशियानंतर जग जिंकायचं” या निर्धाराने खेळाडू अधिक जिद्दीने सरावाला लागले आहेत. या यशामुळे केवळ पनवेल परिसराचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव क्रीडा विश्वात उंचावले असून विजयी खेळाडूंवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.