पुणे : यावर्षी आयोजित केलेल्या पहिल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचे आव्हान अत्यंत कमी कालावधीत साध्य केले. आता पुढील वर्षीच्या दुसऱ्या पर्वाच्या आयोजनाच्या माध्यमातून या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अजून पुढे न्यायचा असून नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

दरम्यान तयारीचा आढावा व निर्णय घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला, पीएमआरडीएच्या अतिरीक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, सीएफआयचे महासचिव मनिंदर पाल सिंह (दूरदृष्य प्रणालीद्वारे) आदी उपस्थित होते.