लोटे : – लोटे एमआयडीसी परिसरातील एका केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत शुक्रवारी दुपारच्या सुमारास रिएक्टरमधील वाढलेल्या दाबामुळे रिएक्टर चा स्फोट झाला. परिणामी परिसरात एकच खळबळ उडाली. हा स्फोट एवढ्या तीव्र स्वरूपाचा होता की, रिएक्टर चे झाकण उडून इमारतीचा स्लॅब फुटला. या घटनेत रिएक्टरमधील रासायनिक पदार्थ कंपनीच्या आवारासह समोरील सार्वजनिक रस्त्यावर उडाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने घटनेच्या वेळी कंपनीबाहेर किंवा रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, कंपनी परिसरातील साहित्याचे नुकसान झाले असून प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका कारचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कंपनीतून मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. हा आवाज परिसरातील वाड्यांपर्यंत ऐकू गेला. त्यानंतर कंपनीतून बाहेर पडलेल्या रासायनिक वायूमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. या वायूमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना त्रास झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जमा झाले आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत निदर्शने केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या घटना या कंपनीत यापूर्वीही घडल्या असून औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिकांनी आरोप केला की, कंपनीतील रिएक्टरमधील दाब नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे हा प्रकार घडला. तसेच कंपनीत जुन्या यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याचा आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचा आरोपही करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच कंपनीच्या कार्यपद्धतीची तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून स्फोटसदृश्य घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. संबंधित शासकीय यंत्रणा आणि औद्योगिक सुरक्षा विभागाकडूनही घटनेची दखल घेण्यात आली आहे.
या घटनेमुळे लोटे एमआयडीसीतील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतरच या घटनेचे नेमके कारण आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे.