दापोली, (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील टेटवली जाधववाडी येथे आज सकाळी एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास चालक माणिक सागळे हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी २०९८) घेऊन टेटवली जाधववाडी परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या होंडा शाईन मोटारसायकलची (क्र. एमएच ०८ एएम २९९१) धडक एसटी बसला बसली.

या अपघातात मोटारसायकलवरील कुणाल विश्वास कात्रे (वय २०, रा. टेटवली) आणि आशिष अनिल रेमजे (वय १८, रा. टेटवली) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दापोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुजर करीत आहेत.