लांजा : पोलीस हे केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठीही तत्पर असतात, याचे जिवंत उदाहरण मंगळवारी दुपारी लांजा शहरात जखमी अवस्थेत रस्त्यावर तडफडत पडलेल्या श्वानाच्या मदतीला धावून गेलेल्या लांजा पोलिसांमुळे पाहायला मिळाले.
लांजा शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर एका जखमी श्वानाची रस्त्यावर तडफड सुरू होती. अनेक वाहनचालक व पादचारी त्या श्वानाकडे पाहून पुढे जात होते; मात्र त्याच्या अवस्थेकडे कुणाचंही विशेष लक्ष नव्हतं. अशा वेळी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन भुजबळराव आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी ही बाब लक्षात घेऊन तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.
या तिघांनी रस्त्याच्या मधोमध तडफडणाऱ्या जखमी श्वानाला सुरक्षितपणे बाजूला घेतले आणि त्याच्या अंगावर पाणी टाकून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी त्वरित नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. माहिती मिळताच लांजा नगरपंचायतीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि श्वानाला पुढील उपचारासाठी घेऊन गेले.
मात्र, सर्व प्रयत्न करूनही त्या श्वानाचा अखेर मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत मदतीला धावून गेलेल्या पोलिसांमुळे लांजात माणुसकीचे चित्र दिसले. तसेच, या घटनेतून पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि प्राणीमात्रांविषयीची माणुसकी सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.
