चिपळूण: कोयना धरणातील पाणी थेट मुंबईला नेण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील स्थानिक पाण्याची गरज प्रथम पूर्ण झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली आहे. कोकणातील जनतेची तहान, शेती आणि स्थानिक पाणीपुरवठ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडविल्यानंतरच अतिरिक्त पाणी मुंबईला देण्याचा विचार व्हावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली असून, या संदर्भातील अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, कोकणातील ज्या गावांना पाण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी प्रथम पाणी लिफ्टिंग करून पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आयआयटीकडे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी सोपविली आहे. या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी जलसंपदा विभागाचे आभार मानले.
या पाण्याचा वापर करताना वीजखर्च कमी ठेवून दामनावन आणि टेरव यांसारख्या भागांत पाणी पोहोचविण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. तसेच या पाण्याचा वापर खालच्या गावांच्या नळपाणी योजनांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीच्या सिंचनासाठी जास्तीत जास्त कसा करता येईल, यावर भर देण्यात येत आहे. कोकणातील पाणीटंचाई आणि शेतीचे प्रश्न लक्षात घेता हा विषय आगामी अधिवेशनात ठामपणे मांडणार असल्याचेही आमदार निकम यांनी सांगितले.
दरम्यान, कोकणच्या हापूस आंब्याच्या मानांकनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणच्या हापूस आंब्याला मिळालेल्या मानांकनाच्या कक्षेत वलसाड आणि जुन्नर यांचा समावेश करण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
हापूस आंब्याचे वैशिष्ट्य, त्याची भौगोलिक ओळख आणि कोकणातील आंबा उत्पादकांचे हित जपण्यासाठी हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. हा प्रश्न कायदेशीर स्वरूपाचा असल्याने कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि आंबा उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोकणच्या हापूस आंब्याचे मानांकन कायम राखण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धारही आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला. कोकणातील पाण्याचा हक्क आणि हापूस आंब्याची अस्मिता या दोन्ही प्रश्नांवर आपण ठामपणे भूमिका घेणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.