मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.मूळ कंत्राट देताना मूळ निविदेतील वाढ सुमारे २६ टक्के इतकी होती.तरीही कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प, वारंवार मुदतवाढ, कामातील दिरंगाई आणि आता कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्याच्या नावावर कमिशन वाढी साठी दिलेला इशारा आहे.स्मारक पूर्ण न होण्याला आणि खर्च वाढी साठी आजवर जबाबदार आहे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला आहे.नोटिसा देण्याची नौटंकी बंद करून कमिशनखोरीची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी केली आहे.

सन २०१८ मध्ये शापूरजी पालोनजी कंपनीला इंदू मिल स्मारकाचे बांधकाम करण्याचे कंत्राट देण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नोंदीनुसार ६२२.४० कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकीय किमतीच्या तुलनेत ७०९ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली. अर्थात मूळ निविदा किमती पेक्षा जास्त दराने कंत्राट दिले होते.पुढे प्रकल्पाच्या संकल्पनेत बदल झाल्याने खर्चात वाढ झाली.मात्र, ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी असतानाही आजपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.कामाच्या दिरंगाई बद्दल संबंधित कंपनीला तीन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. तसेच कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सामाजिक न्याय विभागाकडे विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, प्रश्न असा आहे की, तीन वेळा नोटिसा देण्याची वेळ येईपर्यंत प्रशासन झोपले होते काय? कंत्राटदाराला वेळोवेळी मुदतवाढ कोणी दिली? निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची होती? शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला देय असलेला निधी वेळेत का पोहोचला नाही? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रकल्पातील आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता कुठे आहे? प्रकल्प रखडण्यात आणि खर्च वाढी साठी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा विषय आहे.मात्र, दहा वर्षांहून अधिक काळ लोटूनही स्मारकाचे काम पूर्ण होत नसेल, तर ही केवळ प्रशासकीय दिरंगाई म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. कंत्राटदाराला नोटिसा देणे, काळ्या यादीत टाकण्याची भाषा करणे आणि पुन्हा मुदतवाढ देणे, हा सगळा प्रकार म्हणजे कमिशन वाढी साठी केलेली नौटंकी आहे.काम करून घेण्याऐवजी नोटिसा आणि मुदतवाढींचा खेळ सुरू आहे.या प्रकल्पातील निधी वितरण, कंत्राटदार आणि उपकंत्राटदारांचे आर्थिक व्यवहार, शिल्पकाराला दिलेला निधी आणि वाढीव खर्च यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेत दलाली व आर्थिक संगनमत सुरू आहे. प्रकल्प जाहीर करून रखडवत न्यायचा आणि वाढीव निधी मंजूर करून कमाई करण्या साठी मंजुरी द्यायची, हे खपवून घेतले जाणार नाही.बाबासाहेबांच्या नावावर कोट्यवधींचा खर्च दाखवायचा आणि प्रत्यक्षात स्मारकाचे काम रखडवायचे, हे सहन करणार नाही.
वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात संपूर्ण आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र लेखापरीक्षण, निविदा प्रक्रियेची चौकशी, निधी वितरणाचा तपशील सार्वजनिक करणे, दोषी अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करणे आणि स्मारक पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची मागणी केली आहे.बाबासाहेबांचे स्मारक हा कोणाच्याही दलालीचा किंवा आर्थिक फायद्याचा विषय होऊ शकत नाही.स्मारक पूर्ण करा, आर्थिक व्यवहारांचा हिशेब द्या आणि दोषींवर कारवाई करा अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.