दापोली: महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, अध्यात्माचा आणि सामाजिक प्रबोधनाचा एक महत्त्वपूर्ण वारसा असलेल्या, संतांच्या विचारांचा प्रसार, समाजप्रबोधन आणि भक्तीभावाची जोपासना करणाऱ्या भजन परंपरेचा आज दापोलीत मोठा जागर मांडला गेला. गावोगावी रुजलेली भक्तीची संस्कृती आणि पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली हि भजन परंपरा कोकणातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. मंदिरांच्या गाभाऱ्यापासून गावच्या पारापर्यंत आणि हरिनामाच्या गजरापासून वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वाटचालीपर्यंत विस्तारलेल्या या परंपरेला नवी ऊर्जा देण्याच्या उद्देशाने दापोली भाजपाच्या पुढकाराने कार्तिकी एकादशीनिमित्त या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत काटेकोर आयोजन आणि नेत्रसुखद सजावटीने ही भजन स्पर्धा दापोलीच्या सांस्कृतिक वातावरणात भक्तीचा नवा सूर मिसळणारी ठरली आहे.
भारतीय जनता पार्टी, दापोली आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या पुढाकारातून संपन्न झालेल्या या सांस्कृतिक उपक्रमाला अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ, महाराष्ट्र राज्य (रजि.), शाखा दापोली यांचा मोलाचा हातभार लागला होता. हा भक्तिमय सोहळा आज रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दापोली येथील राधाकृष्ण मंदिरात दुपारी साडे चार वाजल्यापासून प्रारंभ झाला. तब्बल आठ तास चाललेल्या या भक्ती सोहळ्यात तालुक्यातील श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, कुंभवे., श्री दत्तसेवक भजन मंडळ, पाडले., श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, हर्णे-सुतारवाडी.,   भाविक महिला भजन मंडळ, माटवण., श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, ओणी., श्री राम प्रासादिक भजन मंडळ, पाज पंढरी., श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, आंजर्ले., आझाद वाडी विकास मंडळ, गिम्हवणे., पुरुषोत्तम प्रासादिक भजन मंडळ, जालगांव. आणि जालगांव येथील श्री लक्ष्मीनारायण प्रासादिक भजन मंडळ. या दहा मंडळाना स्पर्धेसाठी निमंत्रित केले गेले होते. अखिल भजन हितवर्धक मंडळ, शाखा दापोलीने या स्पर्धेचे नियम, वेळ, भजन सादरीकरणाची क्रमवारी म्हणजे सादरीकरणामध्ये प्रार्थना, भजन- राम कृष्ण हरी, रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग, गजर त्यानंतर-अभंग, गवळण व भारुड या क्रमाने सादरीकरण करणे,अशा भजन सादरीकरणातील मूलभूत आणि शास्रोक्त बाबी संभाळून या स्पर्धेच्या आयोजनाचे मापदंड आखून दिले होते. त्यामुळेच हि स्पर्धा नियोजन आणि स्पर्धकांच्या शिस्तबद्ध सहभाग व सुरेल सादरीकरणाने अविस्मरणिय ठरली आहे. यावेळी अखिल भजन हितवर्धक मंडळ महाराष्ट्र चे अध्यक्ष भगवान लोकरे बुवा आणि सल्लागार श्रीधर मुणगेकर बुवा यांच्यासह मंडळाच्या दापोली शाखेचे अध्यक्ष रमेश कडू यांनी स्वतः उपस्थित राहून दापोलीतील याप्रकारच्या पहिल्याच स्पर्धेच्या नियोजनातील बारकावे दापोली भाजपाच्या आणि फाटक डेव्हलपर्स च्या आयोजकांना समजावून देत स्पर्धा उत्तम रितेने पार पाडली. या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी देखील भजन हितवर्धक मंडळाच्या वरील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संभाळली होती. ज्यामध्ये श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, पाजपंढरी. यांनी प्रथम क्रमांकाचे सादरीकरण करून दापोलीतील या भव्य भजन स्पर्धेवर आपले नाव कोरले. तर, श्री दत्तसेवक भजन मंडळ, पाडले आणि श्री विश्वकर्मा भजन मंडळ, कुंभवे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीत क्रमांका चे बक्षीस मिळवत या स्पर्धेला परिपूर्णतः आणली. या बक्षीस विजेत्या भजन मंडळाना अनुक्रमे दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, केदार साठे, अक्षय फाटक, भाजपा दापोली तालुकाध्यक्ष सौ. जयाताई साळवी, सचिन होडबे, गुहागर पंचायत समितीचे उप सभापती निलेश सुर्वे, संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ कीर्तनकार अशोक परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच कोकणातील भजनरत्न, भजनसम्राट, कोकण कलाभूष कै. चंद्रकांत कदम यांच्यासह कोकणातील कै. परशुराम पांचाळ, कै.विलास चाळके, कै.चिंतामणी पांचाळ, कै.वामन खोपकर, कै.अनंत महाडिक या भजन महर्षी म्हणून गौरवल्या गेलेल्या विभूतीच्या स्मृतीना विनम्र आदरांजली अर्पण करून आयोजकांनी स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी उपस्थित भाजपचे जिल्हाध्यक्ष सतिश मोरे यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धेच्या अत्यंत नीटनेटक्या आयोजनाबाबत फाटक डेव्हलपर्स आणि दापोली भाजपाचे कौतुक केले. गावोगावी असणारी भजनी मंडळे आजही ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र, बदलत्या काळात अशा पारंपरिक कलांना प्रोत्साहन देणारी आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी व्यासपीठे निर्माण होणे ही काळाची गरज आहे. आणि हिच गरज लक्षात घेऊन दापोली भाजपने या स्पर्धेसाठी पुढाकार घेत तालुक्यातील भजन मंडळाना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल हि त्यांनी दापोली भाजप आणि स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेल्या फाटक डेव्हलपर्स चे आभार मानले.
हरिनामाचा गजर, संतविचारांचा जागर आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगलेल्या या भजन स्पर्धा सोहळ्याला तालुक्यातील  भजनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.